सध्या पर्यावरण हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक बनला असून या मुळेच पर्यावरण शास्त्राचे महत्व इतके वाढले आहे की हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आज या विषयाचे महत्त्व एक जागतिक दर्जाचे झाले असून या विषयावरती बऱ्याच अशा जागतिक परिषदा आयोजित केल्या जात आहेत याच्या पाठीमागील कारण म्हणजेच वसुंधरेच रक्षण, संरक्षण आणि वसुंधरेवरील म्हणजेच पृथ्वीवरील असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करणे हे त्याच्या पाठीमागील कारण आहे. या वसुंधरेच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी देशभरामध्ये व तसेच विविध देशांमध्ये त्यांचे प्रतिनिधी आणि संशोधक हे एकत्रपणे येऊन या विषयावरती चर्चासत्र व्याख्याने आणि परिषदा आयोजित करत आहेत. यामधून विविध प्रकारची उद्दिष्टे ठरवली जात आहेत यामध्ये प्रत्येक राष्ट्र आपापल्या पद्धतीने राष्ट्राच्या पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने कार्य करत आहे. यामध्ये सध्या आंतरराष्ट्रीय G20, C40, COP, ENVI कौन्सिलियम, UNEP, UNICEF, WHO तर राष्ट्रीय पातळीवर LiFE, मिशन सोलार, मिशन एनर्जी, मिशन सस्टेनेबल वॉटर, मिशन सस्टेनिंग हिमालयन इकोसिस्टीम, मिशन ग्रीन इंडिया, मिशन सस्टेनेबल एग्रीकल्चर अशा विविध माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी संशोधन कार्य व तसेच पर्यावरणीय सामाजिक कार्य केले जात आहे व याचा प्रसार व जनजागृती विविध माध्यमातून केली जात आहे.
शिक्षण क्षेत्रात व तसेच योजना क्षेत्रात पर्यावरण शास्त्र हे सर्वाधिक महत्त्वाचे ठरलेले आहे. आज कोणताही शासकीय किंवा खाजगी प्रकल्प हाती घ्यायचा असेल किंवा पूर्ण करायचा असेल तर त्यास केंद्रीय किंवा राज्य पर्यावरण आघात अहवाल किंवा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मान्यता सादर करणे अनिवार्य आहे हे जर नाही केले तर त्या प्रकल्पास कोणत्याही प्रकारची मंजुरी मिळत नाही या मधूनच भारत देशात मानवी आणि पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाच्या दृष्टीने न्याय देणाऱ्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हरित लवाद (NGT) सारखी उच्च न्यायालय तयार झालीआहेत. अलीकडच्या काळात समाजामध्ये या विषयात खूप जागृती निर्माण झालेली आहे आणि अजूनही होत आहे. राज्यात सर्वच एमआयडीसी मधील असणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांसाठी एन्व्हायरमेंटल ऑफिसर, सेफ्टी ऑफिसर, एन्व्हायरमेंटल मॅनेजर एन्व्हायरमेंटल लॅब असिस्टंट, ईटीपी एसटीपी वॉटर ट्रीटमेंट प्लांट इन्चार्ज अशा अनेक नोकरीच्या संधी इंडस्ट्रीच्या माध्यमातून होत आहे. याबरोबरच पर्यावरणशास्त्र हे एक नवीन आणि नामांकित विषय व विद्याशाखा म्हणून तिचे महत्त्व वाढले आहे, म्हणून आज बरेच विद्यार्थी संशोधक अभ्यासक विद्यार्थी या विषयाकडे व या विषयाशी निगडित अभ्यासक्रमांमध्ये वळत आहेत. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि भारतातील विविध राज्यांमध्ये बऱ्याच शासकीय व तसेच खाजगी विद्यापीठांनी हा अभ्यासक्रम चालू केला आहे. पर्यावरणशास्त्रचा अभ्यासक्रम हा भूशास्त्र, भूमितीशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,जीवशास्त्र, पदार्थविज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शेती, जीवशास्त्र अशा विविध विषयांमधून निर्माण झालेला आहे. त्याशिवाय या अभ्यासक्रमामध्ये विविध प्रदूषके, प्रदूषण, जैवविविधत, हवामान बदल आणि पर्यावरणाच्या नासाडीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याचा महत्वपूर्ण अभ्यास केला जातो. स्थानिक पातळीवर जैवविविधता आणि त्यांचे उपयोग यावरही या विषया संशोधन केले जाते. या विषयात एक वैशिष्ट्य असे आहे की भौतिक, रसायनिक आणि जैविक शास्त्र अशा केवळ विज्ञानाशी संबंधित शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो असे नाही तर या विषयांमध्ये पर्यावरण अभियांत्रिकी, पर्यावरण कायदा, पर्यावरण इतिहास, पर्यावरण पर्यटन, पर्यावरण अर्थशास्त्र, शेती भूगोल अशा सामाजिक शास्त्रांचाही अभ्यास करावा लागतो. आपणास माहीतच असेल पर्यावरणाचे स्वरूप वरचेवर बदलत चाललेले आहे या बदलाचा वेध घेण्यासाठी अनेक शास्त्रांचा विषयांचा अभ्यास करावा लागतो. यामधूनच विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय व राज्य जलविभाग, ऊर्जा विभाग, सर्वे ऑफ इंडिया, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, नागरी विकास, ग्रामीण विकास, स्वच्छ विकास प्रणाली, केंद्र जलमित्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, पर्यावरण वने, वातावरणीय बदल, राज्य व तसेच केंद्रीय मंत्रालय, केंद्रीय विद्यापीठे राज्य विद्यापीठे व तसेच खाजगी विद्यापीठे,जिल्हाधिकार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, एनजीओ, विविध संशोधन संस्था यामध्ये निरी नागपूर, एनसीएल पुणे, सी एस एम सी आर आय भावनगर गुजरात, सीईई दिल्ली, अशा असंख्य विभागांमध्ये नोकरीच्या संधी विविध पदांसाठी उपलब्ध होत आहेत. यामध्ये पर्यावरण तज्ञ, पर्यावरण सल्लागार, फिल्ड ऑफिसर, रीजनल ऑफिसर, सायंटिफिक ऑफिसर, सस्टेनेबिलिटी एक्सपर्ट, एन्व्हायरमेंटल पॉलिसी ऍनॅलिस्ट, कॉन्झर्वर, पर्यावरण उद्योजक, पर्यावरण सहाय्यक, संशोधक, प्राध्यापकांची अशा अनेक पदांवर काम करण्यासाठी पर्यावरण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होत आहे व तसेच त्यांची यासाठी गरज भासत आहे. या अनुषंगाने पर्यावरण क्षेत्रात करिअरची सुरुवात करता येऊ शकते.
सध्या हा विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर (महाराष्ट्र राज्य विद्यापीठ) येथे 2008 पासून चालू आहे या विषयांमध्ये एम. एस. सी.आणि पीएच.डी या कोर्सेस साठी प्रवेश दिला जातो. गतवर्षापासून याच विषयांमध्ये पदवी कोर्स (बी.एस.सी. पर्यावरण शास्त्र) सुद्धा चालू होत आहे. विद्यापीठात चालू असलेल्या या पर्यावरण शास्त्र विभागाचे महत्त्व हे या विषयाचा अभ्यासक्रम हा नवीन राष्ट्रीय धोरण 2020 च्या अनुषंगाने केला असून या विषयातील संशोधन व तसेच शैक्षणिक बाबीमुळे जिल्ह्यात, राज्यात, देशात व परदेशात याचे महत्त्व वाढले आहे. पर्यावरणशास्त्र या पदव्युत्तर (M.Sc) विषयांमध्ये विद्यापीठातून विद्यार्थिनींमधून प्रथम येणाऱ्यास विद्यापीठाचे गोल्ड मेडल दिले जाते. यामुळेसुध्दा या विषयामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढत चालला आहे.
या विषयाची सध्या प्रवेशाची जाहिरात विविध प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध झाली असून अर्ज स्वीकारणे प्रक्रिया चालू झाली आहे व याची नोंदणी करण्याची शेवटची तारीख 26 मे 2024 असून या विषयाची प्रवेश पूर्व परीक्षा ही दिनांक 29, 30, आणि 31 मी 2024 या तिन्ही दिवशी ऑनलाइन वेब बेस्ड माध्यमातून घेतली जाणार आहे. यासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून परीक्षेची लिंक दिली जाईल व परीक्षेसाठी एक तास इतका कालावधी असेल. या परीक्षेची लिंक नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यासाठी 24 तास खुली राहील जेणेकरून तो विद्यार्थी जिथे असेल तिथून या लिंकच्या माध्यमातून परीक्षा देऊ शकेल. सदरच्या विषयाची, फी व परीक्षेची सर्व माहिती विद्यापीठाच्या https://www.sus.ac.in संकेतस्थळावरती प्रकाशित केली आहे.
प्रा. डॉ. विनायक धुळप
संचालक, भूशास्त्र संकुले
तथा विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र विभाग,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,
सोलापूर विद्यापीठ सोलापूर.
मो.७५८८३८४५७६